Type Here to Get Search Results !

महागांव-उमरखेड परिसरात वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय; गावठी कट्ट्यासह आरोपी जेलबंद



दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक  नरवाडे 

उमरखेड पोलिसांनी तडीपार आदेशाचे उल्लंघन करून गावठी पिस्तूल (देशी कट्टा) बाळगून फिरणाऱ्या आरोपीला अटक केल्याने महागाव-उमरखेड परिसरातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त केले असून जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 31 हजार रुपये असल्याचे सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डी.बी. पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहेकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माळेगाव फाटा परिसरात सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान तडीपार आरोपी आरिफुद्दीन मोहम्मद तारेकुद्दीन खतिब (वय 24, रा. उमरखेड) यास ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता पॅन्टमध्ये लपवून ठेवलेले गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळून आले.

विशेष म्हणजे, याच घटनेच्या एक दिवस आधी महागाव तालुक्यातील आंबोडा परिसरात पुसद येथील एका आरोपीला गावठी पिस्तूलासह अटक करण्यात आली होती. तसेच तलवार घेऊन फिरणाऱ्या एका व्यक्तीवरही पोलिसांनी कारवाई केली होती. सलग घडणाऱ्या अशा घटनांमुळे महागाव तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींची वाढती वर्दळ असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, तालुक्यात सुरू असलेल्या विविध अवैध धंद्यांमुळे बाहेरील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक नांदगाव, फुलसावंगी, कलगाव व इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर ये-जा करत आहेत. पत्त्यांचे अड्डे, अवैध व्यवसाय आणि इतर बेकायदेशीर कृत्यांच्या माध्यमातून गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. चोरी, मारामाऱ्या आणि शस्त्रे बाळगून फिरण्याच्या घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महागाव तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून त्यांचे संपूर्ण उच्चाटन करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबवून गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम 3/25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड आणि पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद लोहेकर, पोलीस हवालदार चंदन जाधव व डी.बी. पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


Post a Comment

0 Comments