Type Here to Get Search Results !

अधिक-मासातील कुप्रथांचा त्याग करा



अधिक मासात जावयाला घरी बोलावून सन्मान करण्याची प्रथा ही महाराष्ट्रासह काही प्रदेशांतील लोकपरंपरा आहे. उपलब्ध धार्मिक ग्रंथांच्या आधारे पाहिले असता, स्कंद पुराण, पद्म पुराण, नारद पुराण किंवा भविष्योत्तर पुराण यांमध्ये अधिक मासाचे माहात्म्य, व्रत, दान, जप, उपवास आणि भगवान विष्णू (पुरुषोत्तम) यांची उपासना यांचा उल्लेख आढळतो; परंतु अधिक मासात जावयाचा सन्मान करावा किंवा "जावयाचे वाण" द्यावे, असा स्पष्ट उल्लेख पुराणांमध्ये आढळत नाही.अधिक मासाशी संबंधित पुराणांमध्ये प्रामुख्याने पुढील गोष्टींवर भर दिला आहे.भगवान विष्णू/पुरुषोत्तम यांची भक्ती.दान, जप, पारायण आणि सत्कर्म.गरजूंना अन्नदान, वस्त्रदान इत्यादी पुण्यकर्मकरण्याचे सांगितले आहे.मग हा अट्टहास कशासाठी?

संत,महात्मे, समाजसुधारक यांनी आपल्याला ह्याच रूढी परंपरेवर घाला घालण्यासाठी शिकवले.आपण ते पुस्तकात वाचतोसुद्धा..!अहो! एवढेच काय, इयत्ता पाहिलेपासून आपल्याला पाठ्यपुस्तकातून शिकवल्या जाते. शालांत परीक्षेत प्रश्नही विचारले जातात.एवढं सर्व आकलन करुन परीक्षा देऊन,या बुरसट चालीरितींना खत पाणी घालण्यास सुशिक्षित वर्ग सध्या अग्रेसर आहे.खोट्या प्रतिष्टेसाठी,मान सन्मानासाठी मेंढीवळणासारखं हजारो लाखो रुपयांचा चुराडा होतोय, कितीतरी मुलींचे बापमाणूस वडील कर्जबाजरी होतं आहे.आपण एकीकडे बघतो नेमकं हा महिना पावसाळ्याच्या तोंडी येतो,पेरणी पूर्व मशागतीची वेळ असते.शेतकरी वर्गाला नांगरणी वखरणी तथा बी-बियाणे खरेदि करण्यासाठी पैशाची निकड भासत असते तर दुसऱ्या बाजूला या लोकरूढी कीं ज्याना कुठेही शाश्त्राचा आधार नाही त्यावर होणारा खर्च यामुळे तो बिच्चारा आर्थिक विवंचनेत सापडतो. कर्जबाजारी होऊन त्याच्यावर आत्महत्येची पाळी येते.

सध्या समाजातील एक विकृती प्रकर्षाने येथे उल्लेखित करावाशी वाटते. "स्टेटस" आम्ही अधिक मासात जावयासाठी केलेलं जावई दान किंवा वाण हे स्टेटस ठेवून नेमकं काय सिद्ध करायचं? हा बडेजाव कश्यासाठी?एकमेकांना दाखण्यासाठी...!मित्रांनो,आपण धार्मिक ग्रंथाना, वेद, पुरानांना परमात्म्याचे वाड:मयीन रूप मानतो.मग पुराणानुसार या मासात भगवान विष्णुची आराधना कोणी केली,दान, जप, पारायण सत्कर्म तथा गरजूंना अन्नदान, वस्त्रदान इत्यादी पुण्यकर्म कोणी केले? नाही ना...! अर्थात आपण धर्माची मूळ शिकवण उपदेश बाजूला ठेवून भरकत चाललोय.काळ बदलत चालला आहे.धर्मावर होणारे अन्याय-आत्याचार थांबत नाहीये. माणूस म्हणून माणसासोबत वागायला तयार नाही.एकवेळी अशिक्षित समाजाने या गोष्टी केल्या तर आपण म्हणूयात कीं, त्यांनी मागील पिढीने जसं सांगितलं तसं वर्षानुवर्षं केलं .हो मान्य आहे, त्यांनी केलंही यात शंका नाही. तो काळ वेगळा होता. दळवळणाची साधने नव्हती.लेकीच्या लग्नानंतर वर्ष-वर्षभर बाप-लेक, माय-लेक बहीण- भाऊ एकमेकांना भेटत नव्हते, म्हणून या अधिक मासाच्या निमित्ताने नातेसंबंध दृढहोण्यास मदत व्हायची.मात्र हल्ली, सर्व सुविधा उपलब्ध आहेत.दळवळणाची साधने, भ्रमनध्वनीच्या माध्यमातून वार्तालाप तथा व्हिडिओ कॉल वगैरे ह्या सर्व घडामोडी आहेतच.यातून सर्व जग जवळ आले मात्र एकमेकांप्रति आपुलकी कुठे? मग ह्या चालीरिती,या बुरसट रूढी परंपरा यांना खत पाणी कश्यासाठी? केवळ दिखावा म्हणून कीं मुलींच्या आई वडीलांचं दिवाळं काढण्यासाठी? म्हणून तरुण सुशिक्षित मित्र मंडीळींनो तुम्हि या गोष्टी टाळा.इतरांना सांगा. या अधिक मासाचे खरं महत्व समाजाला पटवून द्या.या मासाचा मूळ उपदेश तथा शिकवण जशी कीं, ईश-भक्ती करा. गोर-गरीब,गरजू मुलांना शालेय वस्तूंची भेट द्या. गरजवतांना अन्नदान, वस्त्रदान इत्यादी पुण्यकर्म करा.व येणाऱ्या पिढीसाठी एक आदर्श उभा करा.

जर ही प्रथा केवळ एक प्रेमभेट , स्नेह आणि स्वेच्छेने जावयाचा व मुलीचा सन्मान करण्यापुरती मर्यादित असेल तो एक "भावनिक बंध" ठरेल, परंतु जर त्यातून आर्थिक भार, हुंड्यासारखी अपेक्षा, सक्ती, दिखाऊपणा किंवा मुलीच्या माहेरच्या कुटुंबावर अनावश्यक दबाव निर्माण होत असेल, तर अशा स्वरूपातील प्रथा कुप्रथा ठरेल,म्हणून अश्या या अधिक मासातील जावयाचा सन्मान व वाण अश्या या कु-प्रथांचा त्याग करा कीं, ज्यांचा पुराणात कुठेही उल्लेख नाही.

श्री विनोद शेनफड जाधव 

मासरूळ ता जि - बुलडाणा 

Post a Comment

0 Comments