दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
वाकान:महागांव तालुक्यातील काळी (दौ.) वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या इजनी शेतशिवारात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.गेल्या दोन दिवसांत दोन वासरांची शिकार केल्याने परिसरातील शेतकरी मजुर वर्ग व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.
या भागातील अनेक शेतकरी शेतीसोबत दुग्ध व्यवसाय करीत असल्याने जनावरांची देखभाल शेतातच केली जाते.अशातच शेतकरी अवधूत रामराव पाचकोरे व संतोष शोभराव पाचकोरे यांच्या गोठ्यातील दोन वासरांवर बिबट्याने रात्रीच्या वेळी हल्ला करून त्यांचा फडशा पाडला. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
मान्सूनच्या आगमनानंतर खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी दिवसरात्र शेतात राबत आहेत. त्यातच वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी अनेकांना रात्री शेतात मुक्काम करावा लागत आहे.व आपली जनावरे शेतातील गोठ्यातच ठेवावी लागत असल्याने बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे जनावरांच्या व शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे.
बिबट्या हा संरक्षित वन्यप्राणी असल्याने त्याचे संवर्धन करणे आवश्यक असले तरी त्याच्या वाढत्या हालचालींमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी अवधूत पाचकोरे व संतोष पाचकोरे यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments