दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
महागांव तालुक्यातील विविध गावांमध्ये हातभट्टी दारूचे उत्पादन आणि विक्री पुन्हा वाढल्याची चर्चा असून यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी महागाव पोलीस ठाण्याच्या वतीने अवैध दारूभट्ट्यांविरोधात विशेष मोहीम राबवून अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली होती. विशेषतः उटी परिसरातील अवैध दारूभट्ट्यांवर कारवाई करून त्या उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या.
मात्र, तत्कालीन ठाणेदार धनराज नळे यांची कळंब येथे बदली झाल्यानंतर ही मोहीम मंदावल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. फुल सांगवी, काळी टेंभी,इजणी, पिंपरी,पिंपळगाव, भांब, बेलदरी, घाणमुख, सेनंद, दगडथर, पोखरी तसेच इतर ग्रामीण भागात हातभट्टी दारूचे प्रमाण वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, अवैध हातभट्टी दारूमुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. अलीकडील काही विषारी दारू प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात अशा प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने वेळेत पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.सध्या महागाव पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कारभार अंभोरे यांच्याकडे असल्याचे सांगितले जात आहे. नव्याने नियुक्त होणारे ठाणेदार अवैध दारूभट्ट्यांविरोधातील मोहीम अधिक प्रभावीपणे राबवतील का, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, एकता पत्रकार संघाने संपूर्ण महागाव तालुक्यात विशेष मोहीम राबवून हातभट्टी दारूचे उत्पादन व विक्री पूर्णपणे बंद करण्याची मागणी केली आहे. अवैध दारू व्यवसायामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
तालुक्यात अवैध दारूविरोधातील कारवाई पुन्हा वेगाने सुरू होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments