; महागांव पोलिसांच्या तत्परतेने टळला अनर्थ वेळेवर वैद्यकीय मदत मिळाल्याने महिला सुखरूप; पोलीस प्रशासनाचे कौतुक
दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
महागांव पोलीस प्रशासनाने कर्तव्यदक्षतेसोबतच माणुसकीचे दर्शन घडवत, प्रवासादरम्यान अचानक प्रकृती बिघडलेल्या एका महिलेला तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देत संभाव्य अनर्थ टाळला आहे. पोलिसांच्या या तत्परतेमुळे सर्वस्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
नेमकी घटना काय?
नागपूर–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर महागाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी (API) सुनील आंबूरे हे आपल्या पथकासह नियमित पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, भिसे पेट्रोल पंपासमोर एका ट्रॅव्हल्स बसजवळ त्यांना गर्दी दिसून आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
चौकशीअंती असे समजले की, बसमधील प्रवासी गुलरान अल्ताफ शेख (वय ३२, रा. सोलापूर) यांना प्रवासात तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. महिलेची अवस्थापाहून ए.पी.आय सुनील आंबूरे यांनी विलंब न करता पोलीस पथकाच्या मदतीने त्यांना तात्काळ महागांव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
मोठा अनर्थ टळला
शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर, अधिक उपचारांसाठी संबंधित महिलेला महागांव शहरातील सूर्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर असून, त्यांना पुढील प्रवासासाठी सुखरूप रवाना करण्यात आले.
संकटाच्या वेळी मदतीला धावून आलेल्या महागांव पोलिसांबद्दल प्रवासी महिलेच्या नातेवाईकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. "पोलीस हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे नसून संकटसमयी सामान्य नागरिकांचे खरे आधारवड आहेत," अशा शब्दांत उपस्थितांनी महागांव पोलिसांच्या या मानवतावादी भूमिकेचे कौतुक केले.

Post a Comment
0 Comments