Type Here to Get Search Results !

झारगडवाडीत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी;



 गुणवंत विद्यार्थी व पोलिस भरती कन्येचा सत्कार

झारगडवाडी, प्रतिनिधी-राहुल चव्हाण 

बारामती : दि.३१ रोजी झारगडवाडी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात गावातील दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या कु. शिमरन रहिम बेग हिचा समस्त ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी राजमातांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आदर्श विचारांचे स्मरण केले. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अधिक प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच अवघ्या १८ व्या वर्षी महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या कु. शिमरन रहिम बेग हिचे विशेष कौतुक करण्यात आले. तिच्या यशामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रशासकीय समिती सदस्य, विविध संस्थांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments