दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत अखेर अपक्ष उमेदवार नितीन भुतडा यांनी माघार घेतल्याची चर्चा रंगताच जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात हास्यकल्लोळ उडाला आहे. निवडणुकीच्या आखाड्यात उतरताच अनेकांच्या राजकीय गणितांना पंख फुटले होते. मात्र माघारीच्या निर्णयामुळे काहींची स्वप्ने हवेतच विरल्याचे चित्र दिसून आले.
राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा रंगली आहे – "एप्रिल फूल बनाया, उसका क्या कसूर!" कारण निवडणूक होणार, बैठका होणार, समीकरणे जुळणार, अशा अनेक अपेक्षा बाळगून बसलेल्या काही नगरसेवकांना अचानक "गेम ओव्हर"चा संदेश मिळाल्याची चर्चा सुरू आहे.
काही राजकीय खोडसाळ मंडळी तर गंमतीने म्हणत आहेत की, "निवडणुकीच्या निमित्ताने उघडतील असे वाटणारे काही ‘कुबेराचे दरवाजे’ अखेर बंदच राहिले." त्यामुळे कथित "लक्ष्मी दर्शन" कार्यक्रमावरही पाणी फिरल्याची कुजबुज कानाकोपऱ्यात ऐकायला मिळत आहे.
दरम्यान, अनेक नगरसेवकांच्या चेहऱ्यावरील उत्साह अचानक गायब झाल्याचे निरीक्षण काही राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे. काही जण फोनवर व्यस्त, काही जण बैठकीत व्यस्त तर काही जण "काय झाले?" याचे उत्तर शोधण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे.
विशेष म्हणजे, बंद दरवाज्यांआड नेमके काय घडले, कोण कोण भेटले, कोणाचे गणित चुकले आणि कोणाचा डाव साधला, याचा ‘गोड बंगाल’ अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे अफवा, चर्चा आणि विनोद यांना अधिकच खतपाणी मिळत आहे.
एकूणच, विधान परिषद निवडणुकीपेक्षा नितीन भुतडा यांच्या माघारीचीच चर्चा अधिक रंगली असून राजकीय वर्तुळात सध्या एकच प्रश्न विचारला जात आहे –
"एप्रिल फूल कोणी केला आणि फूल कोण झाले?"

Post a Comment
0 Comments