काँग्रेसचे दिग्गज झाले एप्रिल फूल? बंद दरवाजामागे नेमके काय घडले, उमरखेड-महागांवमध्ये चर्चांचा पाऊस
यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून ऐनवेळी माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांचा अक्षरशः स्फोट झाला आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण घडामोडीत त्यांनी कोणालाही सोबत न घेता "वन मॅन आर्मी" शैलीत खेळी केल्याची राजकीय वर्तुळात गंमतीशीर चर्चा रंगली आहे.
उंबरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघातील पूर्वीच्या निवडणुकीत काँग्रेसमधील काही कार्यकर्त्यांकडून अपेक्षित साथ मिळाली नसल्याची खंत साहेबरावांच्या मनात होती, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत त्यांनी अचानक एंट्री घेतली आणि नंतर तितक्याच वेगाने एक्झिट घेत सर्वांनाच विचारात टाकल्याचे बोलले जात आहे.
आता चर्चा अशी रंगत आहे की, "फॉर्म भरला कोणासाठी आणि माघार घेतली कोणासाठी?" याचे उत्तर शोधण्यात अनेक राजकीय विश्लेषक व्यस्त झाले आहेत. काही जण तर गंमतीने म्हणत आहेत की, "साहेबरावांनी फॉर्म भरला आणि अनेकांचे बीपी वाढले; माघार घेतली आणि अनेकांचे गणितच कोसळले!"
काँग्रेसमधील काही माजी आमदार, माजी मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनाही या घडामोडींचा अंदाज आला नव्हता, अशी चर्चा राजकीय कट्ट्यांवर सुरू आहे. त्यामुळे "साहेबरावांनी सर्वांना एप्रिल फूल केले का?" हा प्रश्न आता चहाच्या टपऱ्यांपासून राजकीय बैठकींपर्यंत पोहोचला आहे.
दरम्यान, "बंद दरवाजामागे नेमके काय झाले?" हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच आहे. काहींच्या मते राजकीय रणनीती होती, काहींच्या मते नाराजीचा संदेश होता, तर काहींना हा संपूर्ण प्रकार एक "मास्टरस्ट्रोक" वाटत आहे.
एकूणच, विधान परिषद निवडणुकीपेक्षा साहेबराव कांबळे यांच्या एंट्री आणि एक्झिटचीच चर्चा अधिक रंगली असून उंबरखेड-महागावसह जिल्हाभरात एकच वाक्य ऐकायला मिळत आहे "खेळ तर साहेबरावांनी केला, पण आउट कोण झाले हे अजूनही समजले नाही!"

Post a Comment
0 Comments