दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या महागांव तालुक्यातील बळीराजासमोर यंदा संकटांचे नवे आव्हान उभे ठाकले आहे. एकीकडे पावसाची अनिश्चितता, दुसरीकडे शेतीमालाला मिळणारे कवडीमोल दर आणि त्यातच खतांच्या किमतीत झालेली अभूतपूर्व वाढ यामुळे येथील शेतकरी चिंतेत सापडला आहे.
खरिपाचा हंगाम तोंडावर असताना खते, बियाणे, कीटकनाशके, डिझेल आणि मजुरीच्या वाढत्या दरांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मागील हंगामातील नुकसान भरून निघालेले नसतानाच, नवीन हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक आव्हानाचा सामना करावा लागत आहे.
वाढत्या खर्चाचा फटका:
खतांच्या किमतीत वाढ: १५:१५:१५ खतांच्या गोणीमागे ४२५ रुपये, १९:१९:१९ खतावर ३७५ रुपये, तर अमोनियम फॉस्फेट सल्फेटवर ४०० रुपयांची वाढ झाली आहे.
इतर साहित्य: कीटकनाशकांच्या किमतीत १५ते २० टक्के, तर बियाण्यांच्या दरात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी:
सोयाबीन, कापूस, तूर आणि मूग उत्पादकांना पेरणीपूर्वीच हजारो रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. वाढत्या खर्चाच्या तुलनेत शेतीमालाला अपेक्षित भाव मिळेलच याची कोणतीही खात्री नसल्याने, महागाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडला आहे. सध्या शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असून, पेरणी करावी की थांबावे, या विवंचनेत दिवस काढत आहेत.

Post a Comment
0 Comments