दोन घरफोडीच्या गुन्ह्यांतील मुख्य आरोपी गजाआड, १००% मुद्देमाल जप्त!
दवंडी वार्तापत्र तालुका प्रतिनिधी: विवेक नरवाडे
महागांव पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा (LCB) यवतमाळ (कॅम्प पुसद) च्या पथकाने एक मोठी आणि कौतुकास्पद कारवाई केली आहे. महागांव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात झालेल्या चोरीसह एकूण दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल अवघ्या काही तासांतच करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत मुख्य आरोपी सुरज प्रकाश पवार याला शिताफीने अटक करण्यात आली असून, गुन्ह्यातील १००% मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महाविद्यालयात झाली होती चोरी
मिळालेल्या माहितीनुसार, महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या दरवाजाची कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरांनी संगणकप्रिंटर व इतर साहित्य चोरून नेले होते. या घटनेमुळे शैक्षणिक परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात अप क्र. २१९/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अशी झाली आरोपीला अटक
दिनांक ०६/०५/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ (कॅम्प पुसद) चे एल.सी.बी. पोलीस पथक पुसद व उमरखेड उपविभागाच्या हद्दीत अज्ञात आरोपींच्या शोधात रवाना झाले होते. गोपनीय माहिती गोळा करत असताना पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली की, सदर घरफोडी १) सुरज प्रकाश पवार (रा. आठवडी बाजार, फुकटनगर, महागांव) आणि त्याच्या इतर ३ साथीदारांनी केली आहे.
आरोपी सुरज पवार हा महागाव बाजारपेठ परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच, एल.सी.बी. पथकाने तात्काळ बाजारपेठ गाठली. पोलीस कौशल्याचा वापर करून अत्यंत शिताफीने सुरज पवार याला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसी खाक्या दाखवताच दिली कबुली
सुरुवातीला आरोपी सुरज पवार याने पोलिसांनाउडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला अधिक विश्वासात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पोपटासारखे बोलण्यास सुरुवात केली. हा गुन्हा त्याने आपल्या इतर ३ साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली.
३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घरफोडीतील चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
यामध्ये: दोन सीपीयू (CPU),एक मॉनिटर (संगणक),एक प्रिंटर ,की-बोर्ड आणि माऊसअसा एकूण ३०,०००/- रुपये किमतीचा १००% मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे महागाव परिसरातील चोरट्यांचे धाबे दणाणले असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलीस आता या गुन्ह्यातील इतर ३ फरार साथीदारांचा कसून शोध घेत आहेत

Post a Comment
0 Comments