दवंडी वार्तापत्र महागांव प्रतिनिधी विवेक नरवाडे
महागांव तालुक्यातील पोहंदूळ फीडरवर असलेल्या विविध गावांमधील वीज पुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने खंडित होत असल्यामुळे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व व्यापारी वर्ग अत्यंत त्रस्त झाला आहे. या गंभीर समस्येवर तात्काळ ठोस उपाययोजना न केल्यास, आगामी सोमवार, दिनांक ०३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्ग (तुळजापूर ते नागपूर) पोहंदूळ फाट्यावर शांततापूर्ण रस्ता रोको (चक्का जाम) आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
या गावांचा समावेश:
मौजे धनोडा, दहिसावळी, पोहंदूळ, तिवरंग, भोसा, मलकापूर, वाकान आणि कोन्दरी आदी गावांतील ग्रामस्थांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
समस्या काय आहे?
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार, गेल्या अनेक दिवसांपासूनविशेषतः रात्रीच्या वेळी वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून अनेक तास वीज उपलब्ध राहत नाही. परिणामी, रात्रीच्या सिंचनासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, व्यापाऱ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासंदर्भात संबंधित कार्यालयाकडे अनेक वेळा तक्रारी व पाठपुरावा करूनही कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही.
आंदोलनाचा इशारा व प्रशासनाला पूर्वसूचना:
प्रशासनाने या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेऊन गावाचा नियमित व अखंड वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा भारतीय संविधानाने दिलेल्या लोकशाही अधिकाराचा वापर करून ग्रामस्थांच्या वतीने दिनांक ०३/०८/२०२६ रोजी रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदनाची प्रत उपविभागीय अधिकारी, उमरखेड यांनाही पाठवण्यात आली आहे.
निवेदनावर रवींद्र रामराव पवार (सरपंच, कोन्दरी), अतुल जयवंत रोहोड, विनोद आनंदराव गानापूर, आळकेश मोहन चव्हाण, रंजन प्यारथ जाधव, निशांत किसन जाधव, अचलयब बाऊद्दीन चव्हाण, दिनेशसंभाजी रावते, सुनील मोहन राठोड, बाळू चेपता जाधव यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment
0 Comments